Shri Gopalnath Maharaj Mandir Triputi, Satara, Maharashtra

श्री परब्रम्ह गोपालनाथ महाराज समाधी मंदिर त्रिपुटी, सातारा


सातारा-कोरेगाव रस्त्यावर साताऱ्यापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर त्रिपुटी येथे गोपालनाथ महाराज यांचे समाधिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 


गोपाळनाथ महाराजांचा जन्म सलाबतपूर या गावी झाला. हे गांव नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात येते.
पयोष्णि नदीच्या तीरावर असलेल्या "रामतीर्थ" या स्थानी तपस्येस गेले. कठीण तपस्या केली. तप फळाला आले. आकाशातून जलप्रसाद पडला. पाठोपाठ श्री दत्तात्रेय प्रगटले. त्यांनी लक्ष्मणाला क्षेमालींगन दिले. श्री दत्तात्रेयानी मनोरथ विचारले. "ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, अन्य काही मागणे नाही" असे लक्ष्मणाने सांगितले. श्री दत्तात्रेयांनी ही इच्छा पूर्ण केली. लक्ष्मण गुडघ्यावर नतमस्तक बसले, बद्धांजुळी पसरुन एकाग्रतेने श्रवण करु लागले. दत्तात्रेयांनी त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेविला व वेदशास्त्राचेबीज असे ब्रह्मज्ञान सांगितले. श्री दत्तात्रेयांनी विचारले "पूर्ण समाधान झाले काय?", उत्तर आले "होय हे दयार्णवा, मी संशयरहित झालो". या क्षणीच "लक्ष्मण" हे "गोपाळनाथ" झाले.
पण थोड्याच वेळात श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि आकाशवाणी झाली - "हे नाथा, तुला सद् गुरु कृपा होताच तुझे ज्ञान सफल होईल. घार मस्तकावर घिरट्या घालीत आहे, त्याच वेळी जो पुरुष तुझ्या पाठीशी उभा राहून तुला दुग्धवाटी पाजेल असा पुरुष हाच तुझा गुरु समज व त्याला शरण जा."
गुरूच्या शोधात गोपाळनाथ भ्रमंती करीत असताना खानदेशात सिऊरबारापाड्याचे या गावी अगदी वर सांगितल्या सारखा प्रसंग घडला व नाथांना त्यांचे गुरू रंगनाथ हे भेटले. हे रंगनाथ सोनार समाजातील सत्पुरूष होते.
श्रीनाथांची गुरूपरंपरा ही आदिनारायनापासून आली. हि नाथ परम्परा आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जी दत्त-जनार्दन-एकनाथ ही परंपरा माहिती आहे, त्याच परंपरेत श्री गोपाळनाथ येतात. श्री गोपाळनाथ हे वरील परंपरेतील रंगनाथांचे शिष्य. गोपाळनाथांचा काळ इ. स. १६९० ते इ. स. १७६६ (शके १६१२ ते १६८८) हा होय. ही परंपरा गोपाळनाथांच्या नंतरही आज अखेर विद्यमान आहे.
रंगनाथांकडे गोपाळनाथांनी ब्रह्मविद्येचे ज्ञान प्राप्त केले. खुद्द दत्तात्रेयांनी वरदहस्त ठेवल्यावरही गोपाळनाथांना गुरूची आवश्यकता होती. रंगनाथांनी गोपाळनाथांना योगविद्देत परीपुर्ण पारंगत केले. रंगनाथांकडे गोपाळनाथांच्यावर जे संस्कार झाले, त्यामुळे गोपाळनाथ सर्वदृष्टीने ब्रह्मविद्या व योगशास्त्र जाणते झाले. गुरूंचे हे ऋण त्यांनी अखंड मिरविले. संप्रदायात जे भजन म्हटले जाते त्यात गुरूशिष्यांच्या या प्रेमाचे चित्र उमटले आहे. "रंगनाथ गोपाळ । जय जय रंगनाथ गोपाळ"
गोपालनाथ महाराज हे एकनाथांच्या परंपरेतील ब्रह्मचारी नाथयोगी. त्यांचा जन्म इ. स. १६९० मध्ये झाला आणि वयाच्या ७६ व्या वर्षी इ. स. १७६६ मध्ये ते समाधिस्थ झाले.

समाधी मंदिराच्या मागे एक बांधीव तलाव आहे. बाजूला गोपालनाथ महाराजांचा मठ आहे. मठाच्या बाजूला एक विहीर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात समाधीच्या दुसऱ्या पायरीवरून सतत पाणी वाहत असते. शांत परिसर व भक्तिमय वातावरणामुळे त्रिपुटी हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. 


1 comment:

  1. माहिती योग्य आहे का प्लीज चेक करा

    ReplyDelete