The war against Aurangzeb on the fort Ajinkyatara, Satara Maharashtra




किल्ले अजिंक्यतारावरील औरंगजेबा विरुद्ध घनघोर युद्ध



किल्ले विशाळगडावर औरंगजेबाच्या सैन्याची प्रचंड दानादान उडाली. महापूरात त्याची प्रचंड हानी झाली. त्याच्या सैन्याचे धैर्य केव्हाच खचले होते. घोडे, हत्ती, सैन्य, संपत्ती पाण्यात वाहून गेली होती. उरलेले सैन्य सोबत घेऊन त्याची स्वारी क-हाडच्या दिशेने निघाली, खरतर त्याला पुन्हा पन्हाळगडावर जायचे होते. पण त्याच्या डोक्यात मराठ्यांची राजधानीला संपवायचेच ही वेडी अतिमहत्वकांक्षा त्याल शांत बसू देत नव्हती. सकाळच्या प्रहरीच मुघली फौजांचा मोर्चा साताराच्या दिशेने वळला. मराठ्यांची राजधानी सातारा !............. 

सांयकाळच्या सुमारास साताराच्या उत्तरेस असलेल्या करंजे गावामध्ये औरंगजेबाची  स्वारी थांबली. समोर होता किल्ले अजिंक्यतारा. त्याचे डोळे चमकले ... चेह-यावर स्मितहास्य आले... अरे हा तर आपण एका दिवसात घेऊ शकतो हा गड घेतला की मराठा साम्राज्य संपले या विचाराने तो मनोमन आनंदी झाला. मरगळेल्या फौजांना तयार राहण्याचे आदेश दिले. लगचेच तोफांचा मारा सुरु केला. 

मुळातच किल्ले अजिंक्यताराची रचना एवढी कठीण होती ती त्याच्या तोफांचा मारा किल्ल्याला लागूच पडत नव्हता. पण किल्यावरून होणारा तोफांचा मारा त्याचे सैन्य सहज टिपत होता. त्याने गडास वेढा घातला गड पार करुन जाणे सहज शक्य नव्हते हे त्याला 700 ते 800 सैन्य गमावल्यानंतर समजले. गडावर कोणत्याही बाजूने चढाई करुन जाणे अशक्यप्राय गोष्ट होती. 

मराठा सरदार आणि मावळे हे काय चीज आहेत हे त्याने आजवरच्या अनुभवातून जाणले होते. 

एका दिवसाच काम त्याला आता कठिण वाटू लागले. पंधरा वीस दिवस तोफांचा मारा करुन काहीही हातास लागत नव्हते. किल्ल्यावरुन मात्र तोफांचा चौफेर मारा त्याचे सैन्य करु शकत नव्हते. तो मागे हटला. काही दिवस शांत बसला. या कालावधीत गडावरील मावळ्यांना तयारीसाठी पुन्हा वेळ मिळाला.

आजुबाजूच्या परिसातील मोठाली वृक्षे तोडून लाकडांचा दमदमा उभारण्यास मुघली फौजांनी सुरुवात केली. त्यावेळी किल्ले अजिंक्यताराचा परिसर बहुतांश जंगलानेच व्यापला होता. फौजेने जवळपासची बहुतांश वृक्षे तोडून जवळपास गडाच्या उंचीचा लाकडांचा दमदमा उभा केला. या कालाधी गडावरील एक तोफगोळा सरळ औरंगजेबाच्या पुढ्यात येऊन पडला होता. तो जर उडाला असला तर औरंगजेब तिथेच ठार झाला असता. या प्रकारमुळे तोही गांगारुन गेला, तोफेचा गोळा हाताने उचलून शहजादा आझम यांस बोलला मराठ्यांचे तोफगोळे आपल्या पेक्षाही चांगले आहेत, असे तोफगोळे आपल्याला हवेत. शहजादा आझम आणि सभोवतालच्या सैन्याची या प्रकारामुळे गाळण उडाली होती.

दमदम्यावर तोफा चढवल्या गेल्या आणि तब्बल दोन महिन्यांनी पुन्हा मुघली फौजांकडून पुन्हा तोफमारा सुरु झाला. तरीही गोळे आत पडत नव्हते. दीड दोन महिने उलटले वेढ्याचे काम चालूच होते.
खब-यांकडून बातमी काढून मंगळाईचा बुरुज उडवून किल्ल्यात प्रवेश करायचा पक्के झाले. मंगळाईचा बुरुज गडावर विजय मिळवून देणारा होता हे मनोमन पटल्यानंतर हताश झाल्या औरंगजेबाने आणखी केली. सर्व सैन्याला तयार राहण्याची ताकीद दिली. गडावर ही खबर मिळाली. मुघल सैन्य आत येताच त्याला कापून काढायची तयारी त्यावेळचा किल्लेदार प्रयागजी प्रभू यांनी केली.
तो दिवस आला. एका बाजूला गडाच्या आत जाण्यासाठी दबा धरून बसलेले मुघली सैन्य दुस-या बाजूला त्या सैन्याला कापून काढण्यासाठी सज्ज झालेले मावळे. दोघेही तयारीत. तोफेचा गोळा उडाला बुरूजावर जाऊन फुटला मुघली सैन्याला प्रचंड आनंद झाला. पण...
उडालेला भला मोठा दगडांचा बुरूज किल्ल्याच्या आत न पडता आत जाण्यासाठी आतुर झालेल्या मुघली सैन्यावर यमदुताप्रमाणे पडला. पाहता पाहता किल्ल्याची कोसळलेली तटबंदी हजारो मुघली सैन्याच्या अंगावर पडली. होत्याचे नव्हते झाले. हजारो सैन्य त्या दगडांच्या खाली गाडले गेले. तसेच येणा-या सैन्याला कापून काढण्यासाठी सज्ज झालेल्या मावळ्यांचेही नुकसान झाले.
ढिगा-यातून कोणाला बाहेर काढायचे कोण मुघल कोण मावळा हेही समजणे अशक्य झाले. तशाच उभा केलेल्या प्रचंड लाकडांच्या दमदम्यास आग लावली गेली कारण मृत्युमुखी पडलेल्या सैन्याची विल्हेवाट लावणे एवढे सोपे नव्हते.
इकडे औरंगझेबाच्या चर्येवर तीव्र निराशा उमटली. संध्याकाळी खाली मान घालून तो आपल्या करंज्याच्या छावणीत दाखल झाला. राञसुद्धा औरंगझेबाला वैरी झाली होती. आठ दिवस साता-याच्या किल्ल्यावरच्या उतारावरची ती आग भडकत होती. आपल्या छावणीत निमूटपणे बसून औरंगझेब ती आग पाहत होता. या शिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता. किल्ल्यावरील मावळेही हाताश झाले होते आगच एवढी प्रचंड होती. दोन्हीकडील सैन्याचे प्रचंड नुकसान झाले. गेली चार महिने कोणाचीही मदत न घेता गडावरील मावळे औरंगजेबाचा मुकाबला करीत होते. त्याला चांगलेच जेरीस आणले. शेवटी गडावरील रसद कमी पडली. तोफगोळे रिकामे झाले. अनेक मावळे गमावले, जायबंदी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने पेटलेली ज्योत मावळ्याच्या रक्तात भिनलेली होती.
आग पूर्ण शांत झाल्या नंतर अगदी म्हसवे गावापासून त्याने पुन्हा तोफांचा मारा सुरु केला. मारा करत करत किल्याजवळ आला. तटबंदी पडल्यामुळे किल्ल्यात प्रवेश करणे शक्य झाले... मरण जवळ आलेल्या औरंगजेबास अजिंक्यातारा तब्बल चार पाच महिन्यांनी जिंकता आला.
अशी अजिंक्यताराची औरंगजेबास जेरीस आणणारी लढाई...!!!
धन्य ते मावळे आणि किल्लेदार...

छत्रपती शिवाजी महाराज की जय !!! हर हर महादेव...

1 comment: